भारतीय कामगार आंदोलन दिवस चिरायू होवो !

१३६ वर्षांपूर्वी म्हणजे २३ सप्टेंबर १८८४ रोजी भारताच्या इतिहासातील पहिले कामगार आंदोलन भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वात मुंबईच्या परळ येथील सुपारी बागेत संपन्न झाले. या आंदोलनात जवळपास ५००० कामगार सहभागी झाले होते. मागणी होती – कामगारांच्या हिताचे कायदे तत्कालीन इंग्रज सरकारने करावे. पुढे रा. ब. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या सततच्या आंदोलनामुळे व रेट्यामुळे अनेक कायदे इंग्रज सरकारला करावे लागले. रविवारची साप्ताहिक सुट्टी सुद्धा १० जून १८९० पासून सुरू करावी लागली. स्त्रियांना रात्रपाळीत काम करण्यावर बंदी घालण्यात आली.

रा. ब. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या ज्या-ज्या मागण्यांचे रूपांतर इंग्रज सरकार कायद्यात करू शकले नाही; त्या बहुतेक सर्व मागण्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ते १९४२ ते १९४६ दरम्यान व्हाईसरॉय कौन्सिल मध्ये मजूर मंत्री असताना कामगार हिताचे कायदे केले.

या कारणाने २३ सप्टेंबर हा दिवस भारताच्या कामगार इतिहासातील एक महत्वपूर्ण दिवस आहे. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत.

रा. ब. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या आद्य कामगार लढ्यातून आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर कामगार मंत्री व पुढे कायदे मंत्री असताना निर्माण झालेल्या कामगार हिताच्या कायद्यांना परत मालक व भांडवलदारांच्या हितासाठी फिरवण्याचे प्रयत्न होत आहेत.

नुकतेच कामगारांना कामावरून काढणे सोपे करण्याचे बील (२२ सप्टेंबर २०२० रोजी) संसदेत बिनदिक्कत पास झाले. त्यातून कामगारांच्या आंदोलन करण्याच्या हक्कावर आणि मालकांसोबतच्या वाटाघाटींच्या कामगार संघटनांच्याही हक्कांवर मोठी बंधने घातली जाणार आहेत. स्त्रियांच्या रात्रपाळीतील कामावरील बंदीही उठवण्यात आली आहे.

अशाप्रसंगी आद्य कामगार लढ्याचे स्मरण करून पुन्हा एकदा रा. ब. नारायण मेघाजी लोखंडे यांचा सत्यशोधक कामगार लढा त्याच जोमाने उभारण्याची गरज आहे. हे काम आंबेडकरी विचारांची कामगार संघटना च करू शकते.

२३ सप्टेंबर – भारतीय कामगार आंदोलन दिवस चिरायू होवो!

  • एन. बी. जारोंडे
    ( प्रसिद्धी सचिव – स्वतंत्र मजदूर युनियन)
    यांच्या फेसबुक वाल वरून (संपादित)
  • https://www.facebook.com/narendra.jaronde.7

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here