अॅबे कॅरे हा संभाजीकालीन फ्रेंच पर्यटक भारतात आलेला होता. त्याने संभाजीराजांना जवळून पाहिले होते. तो म्हणतो, “संभाजींसारखा पराक्रमी, बुद्धिमान आणि सुंदर राजपुत्र मी भारतात पाहिला नाही. संभाजीराजे जगले असते, तर उत्तर भारत जिंकला असता, इतके ते शूर, पराक्रमी, दूरद़ृष्टीचे प्रजावत्सल राजे होते. आज त्यांची जयंती! त्यानिमित्त…
ज्यांच्या धाडसी राजकारणाला वयाच्या आठव्या वर्षी सुरुवात झाली, असा जगातील एकमेव राजपुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. पुरंदर तहाच्या पूर्ततेसाठी वयाच्या आठव्या वर्षी शंभूराजे मोगलांच्या गोटात ओलीस गेले. त्याप्रसंगी संभाजीराजांचे धैर्य, निर्भीडपणा, बाणेदारणा, स्वाभिमान, हजरजबाबीपणा, चातुर्य, सौजन्यशीलता, समयसूचकता याचे वर्णन समकालीन निकोलाओ मनुचीनी केलेेले आहे. शंभूराजे फक्त दोन वर्षांचे असताना मातोश्री सईबाईंचे निधन झाले. आजी जिजाऊ, वडील शिवाजीराजे आणि सावत्र मातांनी त्यांची हेळसांड होऊ दिली नाही. शिवरायांचे शौर्य, पराक्रम आणि राजनीती हे संभाजीराजांचे विद्यापीठ, प्रेरणापीठ होते. वयाच्या नवव्या वर्षी ते वडिलांबरोबर आग्य्राला गेले. तेथील राजकारण, शिवरायांचा बाणेदारपणा-निर्भीडपणा याचे बाळकडू त्यांना मिळाले. जीवघेण्या नजरकैदेतून निसटल्यानंतर संभाजीराजे स्वराज्यात आले. त्यांना जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. संकटांचे डोंगर पार करून जाण्याचे शिक्षण त्यांना बालपणापासूनच मिळालेले होते.
अॅबे कॅरे संभाजीराजांच्या शारीरिक सौंदर्याच्या वर्णनाबरोबरच त्यांच्या शौर्याचे, पराक्रमाचे, विद्वत्तेचे वर्णन मोठ्या उदार अंत:करणाने करतो. वयाच्या दहाव्या वर्षी शिवरायांनी शंभूराजांना गुजरात मोहिमेवर पाठविले होते. त्याप्रसंगी संभाजीराजे आपल्या सैनिकांशी कसे वागले, याचेही वर्णन कॅरे करतो. “संभाजीराजे आपल्या ज्येष्ठ सरदारांशी अत्यंत आदराने वागतात. सहकारी सैनिकांना अत्यंत प्रेमाने वागवितात. जखमी सैनिकांची स्वत: विचारपूस करून त्यांना आस्थेने मदत करतात.” संभाजीराजांच्या पराक्रमाबरोबरच त्यांच्या विनयशील आणि प्रेमळ स्वभावाचेही अॅबे कॅरे वर्णन करतो. “संभाजीराजांना आपल्या पराक्रमाचा, विद्वत्तेचा अहंकार नव्हता, बडेजाव नव्हता.” ‘बुधभूषण’ या ग्रंथात त्यांनी आपल्या वडिलांच्या गुणवत्तेचे प्रतिभाशाली भाषेत वर्णन केलेले आहे.
शंभूराजे जसे तलवारबाजीत निपूण होते, युद्धकलेत निष्णात होते, राजकारणात मुत्सद्दी होते, तसेच ते बौद्धिक क्षेत्रात महाविद्वान होते. त्यांनी विविध भाषांवर प्रभुत्व संपादन केलेेले होते. संभाजीराजांनी ‘बुधभूषण’ नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. परंतु, आजचा बुधभूषण प्रक्षिप्त आहे, असे शरद पाटील सांगतात. संभाजीराजांनी केवळ संस्कृतच नव्हे तर हिंदी, पर्शियन, इंग्रजी भाषेवरदेखील प्रभुत्व संपादन केलेले होते. त्यांनी ‘नखशिख’, ‘नायिकाभदे’ आणि ‘सातसतक’ हे तीन हिंदी ग्रंथ लिहिले होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या शिष्टमंडळाबरोबरच ते रायगडावर इंग्रजीमध्ये बोललेले आहेत. यावरून स्पष्ट होते, की संभाजीराजे महाबुद्धिमान, विवेकी राजकारणी होते. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून संभाजीराजांनी राज्यकारभार केला.
दक्षिण दिग्विजयाप्रसंगी शिवरायांनी कोकणची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती. प्राच्यविद्या पंडित शरद पाटील म्हणतात, की संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले नसते, तर मंत्र्यांनी तेव्हाच त्यांचा घात केला असता. संभाजीराजांना पकडून आग्य्राला पाठवा, असे दिलेरखानाला औरंगजेबाचे फर्मान असतानादेखील दिलेरखानाने संभाजीराजांना निसटून जाण्यास वाट दिली, असे समकालीन कृष्णाजी अनंत सभासद सांगतो. निसटल्यानंतर शिवाजीराजे-शंभूराजांची भेट पन्हाळगडावर झाली. त्याप्रसंगी संभाजीराजे शिवरायांना म्हणतात, “दूधभात खाऊन तुमच्या पायाची सेवा करेन, पण राज्याची वाटणी नको,” यावरून स्पष्ट होते, की संभाजीराजे सत्ताभिलाषी किंवा स्वराज्यद्रोही नव्हते.
शिवरायांच्या निधनानंतर नाउमेद न होता स्वराज्याचे रक्षण करण्याचे महान कार्य संभाजीराजांनी केले. तो काळ कठीण होता. खुद्द औरंगजेब सुमारे पाच-सात लाखांची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. पोर्तुगीज, आदिलशहा, सिद्दी आणि स्वराज्यातील मंत्री अशा अनेक शत्रूंविरुद्ध संभाजीराजांना लढावे लागले. याप्रसंगी संभाजीराजे फक्त 23 वर्षांचे होते. पण न डगमगता त्यांनी सुमारे नऊ वर्षे मोगलांना सळो की पळो करून सोडले. मोगलांचा दरबारी इतिहासकार खाफीखान लिहितो, “संभाजी हा मोगलांसाठी वडिलांपेक्षा (शिवरायांपेक्षा) दहा पटीने तापदायक होता.”
संभाजीराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. गोवा जिंकण्यासाठी मांडवी नदी पार करून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोर्तुगीज घाबरून सेंट झेविअरच्या शवापाशी जाऊन धावा करू लागले. बर्हाणपुरावर हमला करून औरंगजेबावर वचक निर्माण केला. औरंगजेब पुत्र अकबर हा संभाजीराजांच्या आश्रयाला आला होता. अकबराला समुद्रमार्गे इराणला पाठवून दिल्ली काबीज करण्याचे संभाजीराजांचे नियोजन होते. ज्याप्रमाणे शिवरायांनी दक्षिण भारत जिंकला, त्याप्रमाणे उत्तर भारत जिंकण्याचे नियोजन संभाजीराजांनी केले होते.
रात्रंदिन युद्धमोहिमेवर असणार्या संभाजीराजांनी राजधानीची जबाबदारी महाराणी येसूबाईंकडे दिली होती. त्यांच्या नावाचा शिक्का ‘श्री सखी राज्ञी’ देऊन त्यांना कुलमुखत्यावर केले आणि स्वराज्याचे सर्वाधिकार त्यांना दिले. आपल्या सर्व सावत्रमातांना अत्यंत सन्मानाने वागविले. धाकटे सावत्रबंधू राजाराम महाराजांना प्रेमाने वागवले. त्यांचे तीन विवाह संभाजीराजांनी लावून दिले. राजारामाची महाराणी ताराबाईंना युद्धकला-राजनीतीचे स्वातंत्र्य दिले. स्वराज्यातील, परराज्यातील महिलांचा आदर सन्मान केला.
संभाजीराजे म्हणतात, “जो प्रयत्नवादी असतो, तो पुरुषसिंह असतो आणि ज्यांचा देवावर विश्वास असतो, त्याला दुबळा म्हणतात.” यावरून स्पष्ट होते, की संभाजीराजे बुद्धिप्रामाण्यवादी होते. त्यांचा विश्वास कर्तृत्वावर होता. ते विज्ञानवादी होते. संभाजीराजांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली. शेतसारा माफ केला. त्यांना संकटसमयी आधार दिला. गरिबांना न्याय दिला. सरंजामशाहीला पायबंद घातला. औरंगजेबाने संभाजीराजांना तुळापूर-वडू (बु.) या ठिकाणी अत्यंत निर्दयीपणे ठार मारले. सनातनी धर्ममार्तंड आणि औरंगजेब यांच्या क्रूर, निर्दयी मनोवृत्तीने संभाजीराजांचा घात केला. याप्रसंगी संभाजीराजांचे वय फक्त 32 वर्षांचे होते. संभाजीराजे जगले असते, तर उत्तर भारत जिंकला असता इतके ते शूर, पराक्रमी, दूरदृष्टीचे प्रजावत्सल राजे होते. अशा प्रजावत्सल, महापराक्रमी, सुसंस्कृत राजाला विनम्र अभिवादन!
—-
महापराक्रमी, प्रजावत्सल राजा
लेखक : श्रीमंत कोकाटे (लेखक, इतिहास शोधकर्ता)
पूर्व प्रसिद्धि : दैनिक पुढारी (14 मई 2021)










