घडवा समाज आता,सत्यास शोधणारा।
संदेश जोतिबांचा तो,माणूस शोधणारा।।
अंधार साचलेल्या,प्रत्येक त्या युगात।
हाती मशाल घेऊन,काळास खोदणारा।।
जे जे दिसेल त्याने,घ्यावे कवेत सारे।
दृष्टी विशाल ठेऊन,न्यायास जोखणारा।।
जातीत भेटणा-या, प्रत्येक माणसाला।
जो जो मिळेल त्याला,सर्वांस जोडणारा।
जोडून माणसाला,ठेवील जो निरंतर।
ह्रदयात माणसाच्या,स्नेहास कोरणारा
येवो तूफान वारा,की वादळे युगांची।
सारेच थोपवून,सर्वांस तारणारा।
–धनंजय झाकर्डे








