आपल्या बापाचे अश्रू

मित्रांनो,
हा लेख मी आज लिहिणार नव्हतो. कारण हा महिना आपल्यासाठी आनंदोत्सव साजरा करण्याचा महिना आहे. तरीही वाटलं चला जरा हसता हसता मन भरून रडून घ्यावं. आपल्या बापाने (डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी) आपल्यासाठी काय खस्ता खाल्ल्या आहेत याची जाणीव आपल्याला आणि आपल्या सारख्या अनेक भावांना करुन द्यावी. हे लिहिताना माझे डोळे आणि मन भरून येतं आहे. तरीही सुरवात करतो.

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दोन आयुष्यात दोन वेळा मनोसोक्त रडले आहेत. पहिला प्रसंग म्हणजे जेव्हा त्यांच्या दोन वर्षांचा #राजरत्न त्यांना सोडून गेला तेव्हा.
आणि दुसरा प्रसंग नायगाव येथील पुरंदरे स्टेडियमवर कार्यकर्ता मेळाव्यात. हे दोन प्रसंग आपल्या काळजात हात घालून आपलं संवेदनशील मन ढवळून काढणारे आहेत.

राजरत्न दोन वर्षांचा झाला होता, त्यांनी बाबासाहेबांचे घर आणि संसार हा सुखाने व्यापून टाकला होता. त्यातच राजरत्नाला दुहेरी न्यूमोनिया झाला. ताप कमी होण्याची काही लक्षणं दिसत नव्हती. साहेबांच्या माघारी तीन लेकरं मातीआड गेली होती. पण या मुलांवर बाबासाहेबांचा विशेष लळा लागला होता.

१८ जुलै रोजी बाळाला जरा आराम वाटू लागला तेव्हा कुठे १९ तारखेला डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मुलाचा मुका घेऊन कोर्टात कामावर गेले. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते,

शंकर( बाबासाहेबांचा मेहुणा) धावतच कोर्टात आला, आणि त्याने म्हटलं, साहेब लगेच चला, राजरत्नाची तब्येत बिघडली आहे. बाबासाहेबांनी सर्व दप्तर तिथंच सोडून लगोलग टांगा पकडून घराकडे निघाले.

इकडे बाळाने लक्ष्मीबाईच्या ( बाबासाहेबांच्या वहीणी) मांडीवर शेवटचा श्वास सोडला. तिसऱ्या प्रहरी चार वाजता राजरत्नाचा श्वास थांबला. दु:खावेगाने रमाईची दातखिळी बसली. साहेबांना दारासमोर गर्दी दिसली. काय समजायचे ते बाबासाहेब समजून गेले. त्यांनी जो काही हंबरडा फोडला की त्या दुःखाच्या हंबरड्याने पूर्ण चाळ कंपित झाली. साहेबांच्या शेजारी मराठे आणि भंडारी राहत होते. साहेबांचा आकांत बघून त्यांच्याही डोळ्यांना आपोआप धारा लागल्या.
राजरत्नाचे कलेवर बाबासाहेब मांडीवर घेऊन रडत होते. शेवटी एक वृद्ध त्यांच्याजवळ जाऊन ते कलेवर घेऊ लागले तेव्हा बाबासाहेब ते काही सोडेना. शेवटी साहेबांच्या मांडीवरुन अक्षरशः ओढून घेतले……

त्यानंतरच्या काळात बाबासाहेबांना संसारात काही रस उरलाच नाही. याचं वर्णन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपले मित्र दत्तोबा पोवार यांना लिहिलेल्या पत्रात दिसते.
कबीराच्या या दोह्यात त्याचं जीवन दिसतं.
चलती चाकी देखकर- दिया कबीरा रोय |
दो पाटन के बिचमें- साबित बचान न कोय |

दुसरा प्रसंग.

१९५४ साली मुंबई नायगावला पुरंदरे स्टेडियमवर शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यांच्या निमित्ताने महाराष्ट्रातील बहुसंख्य कार्यकर्ते मुंबईत आले.

दिड – दोनशे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ महाविद्यालयांत आयोजित केली होती. जे पहिल्या फळीतील कार्यकर्ते होते त्यांच्यात या ना त्या कारणाने पुढारीपणावरुन मतभेद वाढत चालले होते. ही गोष्ट डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कानावर गेलीच होती. त्यासंदर्भात या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सिद्धार्थ महाविद्यालयात बोलावली होती.

जेव्हा सभेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर आले तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांना एकदिलाने पक्षकार्य करण्याचें तसेच एकजुटीने राहण्याचे आवाहन केले. बोलताना त्यांना खुप गहिवरून येतं होतं. ते बोलले, मी तुम्हां शहरातल्या लोकांसाठी खुप काही केले आहे. पण माझ्या खेड्यातील लोकांसाठी मी काही करु शकलो नाही. माझ्या खेड्यातील बांधवांसाठी मी माझ्या अपेक्षेप्रमाणे जेवढे करावयास पाहिजे होते तेवढेही करु शकलो नाही. आता तर माझी शारीरिक अवस्था तर खुपचं वाईट आहे… माझ्या पाठिमागे माझ्या खेड्यातील बांधवांचं कसं होणार…?

हे बोलतं असतानाच बाबांच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर ओघळू लागला. दोन मिनिटे भावनेच्या भरात खेड्यातील अस्पृश्य बांधवांचे दुःख, दारिद्र्य व इतर प्रश्न त्यांच्या मनश्चक्षूपुढे उभे राहतात ते अक्षरशः गदगदून रडले.

या दोन्ही प्रसंगातील रडण्यात एकच आर्त आकांत होता. जो माणूस पोटच्या पोराला आणि समाजाला एकच समजतो तोच हि तळमळ समजू शकतो.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अश्रूने पूर्ण सभागृह स्तब्ध झाले. सर्व कार्यकर्तेही रडू लागले. त्या भाषणांचा परीणाम पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांवर चांगलाच झाला.( पण तो अधिक काळ टिकला नाही) मतभेद कमी झाले नाहीत पण बाबासाहेबांच्या प्रभावामुळे ते अधिक स्पष्टपणे उघड ही झाले नाहीत.

Subhash Wankhede
https://www.facebook.com/subhash.wankhade.37

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here