मुसलमानांशी जिहाद हा शब्द जोडणे म्हणजे बौद्धीक पांगळेपणा मान्य करणे.जगात अनेक भाषा आहेत.अनेक भाषांची सरमिसळ झालेली आहे.किती तरी उर्दु हिंदी मराठी शब्द दुसऱ्या भाषेचा साज झालेले आहेत हे आपल्या गावीही नसते.पण जिहाद म्हणटला की कान टवकारतात.जिहाद म्हणजे मुसलमानांचं काही तरी….असा भोचक विचार मनात का फडफडतो कळत नाही.जिहाद हा एक अरेबिक शब्द आहे, जो जिहादा या शब्दापासून बनतो.याचा अर्थ आहे अयोग्य, अन्याय, अत्याचाराविरोधात आवाज उठवणे संघर्ष करणे.स्वत:वर,स्वत:च्या कुटुंबावर,समाजावर अन्याय लादला गेला की प्रत्येकजण आवाज उठवतो, निषेध विरोध करतोच,हाच जिहाद.वाईटाशी लढणे,चुकीला प्रश्न विचारणे हा माणुस जिवंत असल्याचे लक्षण आहे
सध्या तनिष्कची जाहीरात जाहीरात मागे घेऊनही जनमानसात पोहचली आणि प्रोडक्टचा जाहीरात करण्याचा उद्देश सफल झाला असं म्हणायला हरकत नाही.प्रसारमाध्यमावर वा मनोरंजन माध्यमावर गुदरलेला हा पहीला प्रसंग नाही.मग तो सिनेमा असो जाहीरात असो,धर्मवाद्यांच्या भावना दुखावल्या या मुद्दयाचा वापर करत सामाजात गोंधळ माजवणे नित्याचे आहे.
स्वामी विवेकानंद म्हणतात, धार्मिकता आदर्श जिवनमुल्यांशी निगडीत असते.मग आदर्श जिवनमुल्ये कोणती तर जिओ और जिने दो., का आम्ही ठरवू ती ! हे आदर्श नाही तर गैरलागू आहे.
तनिष्कच्या त्या जाहीरातीबाबत गहजब करणारे चौकस द्रुष्टीकोन बाळगत नसावेत.हिंदु सुन आणि मुस्लिम सासु यात नविन काहीच नाही.पुर्वग्रह न बाळगता पाहीले तर असे अनेक कुटुंबं आहेत ज्यात आंतरधर्मीय लग्न होऊन दोन धार्मिकसंस्क्रुती आनंदाने नांदतायेत. याविषयावर लिहुन नुकतंच मी हातावेगळे केलेले पुस्तक “नांदतोय सौख्यभरे” यात मी जाणूनबुजून हिंदु मुस्लिम जोडप्याच्या सहजिवनावर लिहीले आहे.यानिमित्ताने अनेक जोडप्यांना,त्यांच्या नातेवाईकांना भेटुन आॅंखो देखी कानो सुनी वास्तव मांडले आहे.कुठेही जोरजबरदस्ती नव्हती. आयुष्याच्या साथीदार म्हणुन योग्य वाटले,विचार प्रेम जुळले आणि लग्नाचा निर्णय घेतला.निदान सज्ञान असलेले तरुण तरुणींना स्वखुशीने आपला साथीदार निवडण्याची मुभा द्यायला तुमचा माझा धर्म आडवा का यावा. या निमित्ताने स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे काही लोक मुद्दा मांडत आहेत की जास्त करुन हिंदु मुलीचं मुस्लिमाशी विवाह करतात.मुस्लीम मुली हिंदुंशी विवाह करत नाहीत.हे एकतर्फी परिवर्तन का? तर त्यांना मी माझ्या खर्या अनुभवाला साक्ष ठेऊन सांगु शकते की हा तुमचा एकतर्फी विचार आहे.अनेक मुस्लिम मुली, अगदी कट्टर मुस्लिम घरातल्या,बुरखा हिजाब घालणार्रांनी ही हिंदु मुलावर प्रेम करुन कुटुंबाशी बगावत करुन लग्न केलेली उदाहरण मी प्रत्यक्ष पाहीली आहेत.समाजात पसरलेल्या लवजिहाद या अतातायी कल्पनेवर प्रकाश टाकुन सत्य जगासमोर मांडणे हा ही माझा एक जिहादच आहे.
हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
तेव्हा हा धार्मिकतेचा नाही तर हिंदु मुस्लिम द्वेष पसरवण्याचा,ठरवून वापरलेला, वापरून गुळगुळीत झालेला मुद्दा आहे.दुर्दैवाने काही चतुर लोक नियोजनपूर्वक आपल्याला फालतू कामाला लावतात आणि आपण वादप्रतिवादात आपली उर्जा वाया घालवतो.
आणि आणखी एका गोष्ट म्हणजे ती सुन विचारते आपके घरमे ये सब रस्मे होती नहीं ना…तर तीला विचारवसं वाटतय, बाई गं इथले मुसलमान म्हणजे इराण अफगाण, इंडोनेशिया मधुन आलेले आहेत असे तुला का वाटते.मुसलमान इथलाच धर्मांतरीत मुळचा रहीवासी आहे.त्याने धर्म बदलला तरी रितीभाती,संस्क्रुती,प्रथापरंपरा याच मातीतल्या बाळगुन आहेत.मुसलमानातही गोदभराई चा कार्यक्रम होतो.अगदी हिंदु रिवाजाप्रमाणे सवाष्ण,फुलांच्या माळा,हिरवा चुडा,चंद्रावर बसवून फोटो असा सगळा यथासांग मामला असतो…नाव फक्त गोदभराई अथवा सतवासा असतो.
तेव्हा आता हिंदु मुस्लिम धर्माचा खेळ थांबवू या.आणि जगण्याशी निगडीत मुद्द्यांवर बोलुया.कारण पोटाला रोटी लागते.,धर्म नाही.
तमन्ना इनामदार
पुणे









